आत्महत्येच्या ईशाऱ्यावर रामबाण उपाय योजल्याने ९३ वर्षीय आजीचे वाचले प्राण

मुलुंड: (शेखर भोसले) ९३ वर्षाच्या आजी लक्ष्मीबाई नारायण अडवळ रा. मुलुंड पूर्व यांनी त्यांचे पालिकेशी संदर्भात असलेल्या काही वाद आणि तक्रारीमुळे उद्विग्न होऊन मंगळवार दि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पोलीस व इतर विभागाला आत्महत्येचा इशारा दिला होता. सदर माहिती नवघर पोलीस ठाण्यास प्राप्त झाली आणि वरिष्ठांनी हे प्रकरण पो.नि. संजय खेडकर यांचेकडे सोपवले.

पो.नि. खेडकर यांनी तात्काळ पालिकेला पत्रव्यव्हार करून सदर आजींच्या तक्रारीचे निवारण करण्याबाबत सांगितले. तसेच स्वतः आजींची भेट घेऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आजी त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. आजींशी चर्चा करताना, बोलताना खेडेकर यांना, आजी स्वामी विवेकानंद यांच्या भक्त असल्याचे समजून आले आणि त्यातून त्यांनी एक अफलातून शक्कल लढवली. त्यांनी आजींना २६ जानेवारी रोजी ध्वजवंदनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बिट चौकी येथे निमंत्रित केले. आजी प्रखर देशभक्त असल्याने त्या हे निमंत्रण नाकारू शकल्या नाहीत.

त्याच अनुषंगाने २६ जानेवारी रोजी आजींना सन्मानाने बिट चौकीत आणण्यात आले व जेष्ठ नागरिक म्हणून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या सन्मानामुळे आजी सदगदीत झाल्या. त्यांचे डोळे पाणावले आणि त्यांनी आत्महत्येचा निर्णय रद्द केला.

पोलिस निरीक्षक संजय खेडकर यांनी लढवलेल्या शक्कलीमुळे ९३ वर्षीय आजी लक्ष्मीबाई नारायण अडवळ यांचे प्राण वाचल्याने मुलुंडमध्ये पो.नि.खेडेकर व नवघर पोलिस ठाणे कौतुकाचा विषय ठरले आहेत.

संबंधित पोस्ट