मुलुंडकर सुप्रिया नायर यांची कोरोना लसीकरणाच्या चाचणीसाठी निवड
- by Reporter
- Dec 26, 2020
- 1993 views
मुलुंड:(शेखर भोसले) भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीसाठी सायन रुग्णालय प्रशासनाकडे नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांमधून मुलुंडच्या नागरिक सुप्रिया नायर यांची निवड करण्यात आल्याने मुलुंडकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाच्या प्रभाग क्र १०६ च्या महिला अध्यक्षा असलेल्या सुप्रिया नायर यांच्यावर दि. २१ डिसेंबर रोजी या लसीकरणाच्या तिसऱ्या फेरीत सायन हॉस्पिटल येथे लस देवून चाचणी करण्यात आली. या पहिल्या लसीकरणानंतर २८ दिवसांनी त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. या लसीकरणानंतर त्यांना कोणताही त्रास होत नसल्याचे तसेच अद्याप कोणताही दुष्परिणाम न झाल्याचे समजले आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगर पालिकेच्या केईएम, नायर, सायन रुग्णालयात ५ डिसेंबरपासून कोरोना लसीची चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या लसीच्या चाचणी दरम्यान त्याचा मानवावर काही दुष्परिणाम होतात का? याचा सध्या अभ्यास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या केईएम आणि नायर आणि सायन रुग्णालयात त्याची चाचणी केली जात आहे. एकीकडे महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात कोव्हीशिल्ड लसीचा अभ्यास सुरू आहे. तर दुसरीकडे पालिकेच्या सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या ‘कोवॅक्सिन’ लसीला राज्य सरकारच्या एथिक कमिटीची परवानगी मिळाली होती. त्यानंतर ‘कोवॅक्सिन’ लसीच्या चाचणीला सायन रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांनी दिली.
सायन रुग्णालयात कोरोना लसीकरणाची चाचणीसाठी अनेक स्वयंसेवकांनी नोंदणी केली होती त्यात मुलुंड पूर्वच्या सुप्रिया नायर यांची निवड होवून त्यांना दि २१ डिसेंबर रोजी लस टोचण्यात आली. 'कोरोनाच्या लसीच्या चाचणीसाठी माझी निवड झाल्याचे जेव्हा मला समजले तेव्हा देशवासीयांसाठी काहीतरी करण्याचे सौभाग्य मला लाभत असल्याच्या विचाराने माझा आनंद गगनात मावेनासा झाला व त्यानंतर २१ डिसेंबर रोजी माझ्यावर लसीकरणाची चाचणी करण्यात आल्याने माझा ऊर भरून आला असून मला खूप समाधान वाटत आहे. या लसीकरणाचा मला काहीच त्रास होत नसून पहिला डोस घेतल्यानंतर आता २८ दिवसांनी लसीकरणाचा दुसरा डोस मला देण्यात येणार आहे', अशी प्रतिक्रिया सुप्रिया नायर यांनी यानिमित्ताने दिली आहे.
अशी दिली जाते लस
भारत बायोटीकची कोवॅक्सिन ही लस दिल्यावर त्या स्वयंसेवकाला किमान अर्धा तास रुग्णालयात विश्रांती करण्यासाठी सांगितले जाते. त्यावेळी त्या स्वयंसेवकावर देखरेख ठेवण्यात येते. त्यानंतर काही त्रास होत नसल्यास त्यांना घरी पाठवण्यात येते. स्वयंसेवक घरी गेल्यानंतरही डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे डॉ. एन. अवध यांनी सांगितले.
दरम्यान, भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सीन लस देण्याआधी स्वयंसेवकाच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच लस देण्याआधी लसीबाबत संपूर्ण माहिती दिली जाते. यानंतर तो स्वयंसेवक तयार झाल्यास त्याची सही घेत लस दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.
आयसीएमआरच्या मदतीने या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्यांद्वारे लसबाबत परिणामकारकता आणि सुरक्षा तपासली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात ही चाचणी यशस्वी झाली तर तिचा लवकरच वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यास मदत होणार आहे.

रिपोर्टर