सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्या' विद्याताई वेखंडे यांचे आवाहन.
- by Rameshwar Gawai
- Dec 20, 2020
- 1488 views
बदलापूर(प्रतिनिधी) सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी जनता उभी राहते. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा,प्रसंगी आंदोलने करण्याची, रस्त्यावर उतरण्याचीही तयारी ठेवा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे यांनी केले. जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्यास आपण स्वतः कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
बदलापूरात राष्ट्रवादी काँग्रेस व शारदा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर या शिबिराला भेट देण्यासाठी आल्या असता विद्याताई वेखंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सध्या कोरोनाकाळात प्रत्येकाला मंत्रालयात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्र्यांना जनता दरबारांचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वत्र मंत्र्यांच्या जनता दरबाराचे आयोजन होत असून त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्या मार्गी लागत आहेत.शरद पवार पाठिशी उभे राहिल्यामुळे समृद्धी महामार्गात जमीनी गेलेल्या शेतकऱ्यांना भरघोस मोबदला मिळाला असल्याचे वेखंडे यांनी सांगितले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागावे, लोकहिताची कामे व्हावीत, असा शरद पवारांचा आग्रह असतो. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच खंबीरपणे उभा असेल,असे आश्वासन विद्याताई वेखंडे यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, महिला शहराध्यक्ष अनिसा खान, माजी नगरसेवक प्रभाकर पाटील, सेवादल जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत यशवंतराव, दिनेश धुमाळ, सुभाष सूर्यराव, आतिष चव्हाण, लक्ष्मण फुलवरे, प्रतिभा मिसाळे, ज्योती वैद्य, विद्या बैसाणे,क्रांती पष्टे, सायली कदम ,माया पगारे, शिल्पा देवळालकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश घोलप, महिला शहराध्यक्ष आस्था मांजरेकर, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण कुडव, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब पाटील,सेवादल जिल्हाध्यक्ष विजयन नायर आदी उपस्थित होते. शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनीही या शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
६७ बाटल्या रक्त संकलित .
घाटकोपर येथील सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने बदलापुरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६७ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून हे शिबिर यशस्वी झाल्याचे आयोजक कालिदास देशमुख यांनी सांगितले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी रक्तदान करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे शिबीर आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम