ड्रग रँकेटमध्ये जे अडकले त्यांच्यावर कारवाई होणारच; पण म्हणून संपूर्ण बॉलीवूडला दोषी ठरवता येणार नाही -गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले स्पष्ट
- by Adarsh Maharashtra
- Oct 17, 2020
- 1396 views
मुंबई :"बॉलीवुडमधल्या काही जणांचा ड्रग रँकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. पण या काहीजणांच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवुड ड्रग रँकेटमध्ये अडकले असल्याचे म्हणणे योग्य होणार नाही. काही दोषींमुळे संपूर्ण बॉलीवुडची बदनामी करता येणार नाही. नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल," असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
देशाच्या उत्तरेकडे फिल्मसिटी उभारण्याची घोषणा झाल्यानंतर अचानकपणे भारतीय चित्रपटसृष्टीचे केंद्र असणाऱ्या मुंबईवर चिखलफेक सुरु झाली. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या मुंबईतल्या बॉलिवुडला बदनाम करणाऱ्यांचे यामागचे हेतू लक्षात घ्यायला हवेत. विशिष्ट विचारधारेतून बॉलिवूडवर हल्ले केले जात असल्याची शक्यता आहे. मात्र शंभरपेक्षा अधिक वर्षांच्या मजबूत आणि समृद्ध परंपरेला मुठभरांच्या चिखलफेकीमुळे धक्का लागणार नाही, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
बॉलिवुडमधील काही घटक ड्रगच्या आहारी गेल्याच्या संबंधाने चौकशी चालू आहे. बॉलिवुडमधील अपप्रवृत्तींचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद घेऊन काम करणारे महाराष्ट्र पोलिस भल्या-बुर्यातील फरक ओळखून वाईट प्रवृत्तींचा योग्य समाचार घेतील. काही जणांच्या चुकीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीला बदनाम करणे योग्य नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
बॉलिवूडशी संबंधित नुकत्याच घडलेल्या काही घटनांचा गैरफायदा घेत परदेशातल्या हजारो फेक अकाऊंटच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्याचे प्रयत्न कसे झाले, हे एव्हाना उघड झाले आहे. याच विचारधारेच्या लोकांनी आता मुंबई-बॉलिवूडला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. मात्र त्यांचे हे कारस्थान उधळून लावण्यात महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. बॉलिवूडसह देशातल्या सर्वच सिनेसृष्टीने मुंबईवरील प्रेम आणि विश्वास पूर्वीसारखाच अभेद्य ठेवावा. महाराष्ट्र पोलिस सदैव तुमच्यासोबत आहेत, असा दिलासा देशमुख यांनी दिला. गुन्हा घडून गेल्यानंतर अवतरणारे पोलिस फक्त सिनेमांमध्येच असतात. महाराष्ट्राचे पोलिस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रसिद्ध आहेत हे बॉलिवूडला बदनाम करु पाहणाऱ्यांनी विसरू नये, असा इशारा त्यांनी दिला.
बॉलिवुडला मुंबईतून हलवण्यासाठी काहींनी देव पाण्यात घालून ठेवल्याचे दिसते आहे. त्यांनी हे लक्षात घ्यावे की, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनकच मुळी दादासाहेब फाळके हा कर्तुत्त्ववान मराठी माणूस आहे. फाळके यांनी सन १९१३ मध्ये ‘राजा हरिश्र्चंद्र’च्या रुपाने चित्रपट सृष्टीची बीजे या देशात सर्वात प्रथम रोवली. भारताला पहिला बोलपट ‘आलमआरा’ हादेखील देशात सर्वप्रथम (१९३१) मुंबईतचं झळकला. शंभरपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असणारी मुंबई हीच देशाच्या सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू होती, आहे आणि राहील. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या या लौकिकाला कोणी, कितीही प्रयत्न केले तर धक्का लावू शकणार नाही, असे देशमुख यांनी बजावून सांगितले.
चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, चित्रपट व्यवसायाला महाराष्ट्राच्या जनतेकडून मिळणारे अपार प्रेम आणि आदर तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे या व्यवसायाला मिळणारे संरक्षण यामुळे चित्रपटसृष्टीने मुंबईत भक्कमपणे पाय रोवले आहेत. बॉलीवुडमधल्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर कलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज आर्टीस्ट यासारख्या हजारो कुटुंबांचा चरितार्थ आज अवलंबून आहे. कितीही संकटे आली तरी मुंबईला असणारे ग्लॅमर, आर्थिक समृद्धी आणि सुरक्षितता यामुळे बॉलिवूडने मुंबईला नेहमीच पसंती दिली आहे. महाराष्ट्राच्या पोलिस दलावर बॉलिवूडचाच नव्हे तर तेलुगू, मल्याळम, बंगाली, कन्नड, गुजराती, पंजाबी येथील चित्रपट व्यावसायिकांचाही पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच देशाच्या काना-कोपऱ्यातून ही मंडळी मुंबईत, बॉलिवूडमध्ये येत राहतात. याचेच दुखणे काहींच्या पोटात असू शकते. त्यातूनच बॉलिवूडच्या पद्धतशीर बदनामीची मोहिम आज चालवली जात आहे, असे देशमुख म्हणाले.
शेकडो तारे-तारका स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लाहोर-कराचीपासून ते देशाच्या काना-कोपऱ्यातून मुंबईत नशीब आजमवण्यासाठी येत राहिले आणि कायमचे मुंबईकर झाले. तेलुगू, मल्याळम, बंगाली, कन्नड, गुजराती, पंजाबी सिनेसृष्टीतल्या यशस्वी कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, गायक-गायिका, वादक, लेखक, कवी आदी सर्वांनीच देश पातळीवरची लोकप्रियता मिळवण्यासाठी मुंबईचा आधार घेतला. कारण या मुंबईने, या महाराष्ट्राने सर्वांचे खुल्या दिलाने स्वागत केले. भविष्यात देखील देशातल्या कोणत्याही प्रांतातल्या कलाकारांना भारतीय सिनेसृष्टीचा मुकूटमणी असलेल्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावायचे असेल तर महाराष्ट्रातले पोलिस, महाराष्ट्राची जनता तुमचे स्वागतच करेल. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे बालिश प्रयत्न करणाऱ्यांनी वेळीच शहाणे व्हावे, असे देशमुख यांनी सुनावले.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम