भारतीय संविधानाचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्रीयन जनतेच्या आरोग्यासाठी घातक व्यक्ती आहे. भिम आर्मीने केली राज्यपाल हटावची मागणी.
- by Adarsh Maharashtra
- Oct 15, 2020
- 2148 views
मुंबई (प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय संविधानातील 'धर्मनिरपेक्षता' या पायाभूत तत्त्वाचा उपहास करून महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी संविधानाचा घोर औचित्यभंग केला आहे , संविधानाचा धडधडीत अपमान केला आहे. महाराष्ट्र राज्याला कोरोना सारख्या महामारीने ग्रासलेले असताना मंदिरासारखी सार्वजनिक आणि हमखास गर्दीची ठिकाणे उघडण्याचा अनाठायी सल्ला राज्यपाल महोदयांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्राने दिला आहे. इतकेच नव्हे, तर ते पत्र जाहीर केले आहे. त्या पत्रातील भाषा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारी आहेच, त्याशिवाय, त्यांनी प्रार्थनास्थळे उघडण्याचा दिलेला अनाहूत आणि अनाठायी सल्ला राज्याच्या आरोग्यव्यवस्थेसाठी अतिशय धोकादायक आहे तसेच लोकनियुक्त सरकारच्या विरोधात जनतेच्या एका विशिष्ट गटाला चिथवण्याचाच हा एकप्रकारे कट आहे ,असा घणाघात भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांनी केला असून संविधानविरोधी राज्यपालांची महाराष्ट्रातून लवकरात लवकर हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा कांबळे यांनी केल्याची माहिती भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आज कोणी मंदिरे उघडण्याच्या मागणी करेल तर उद्या मशिदी, चर्च, गुरूद्वारे आणि अन्य सार्वजनिक प्रार्थनास्थळे खुली करावीत, अशी मागणी सर्व धर्मांतील हितसंबंधी मंडळी करू लागतील.ज्याचे भान राज्यपाल पद भूषविणाऱ्या व्यक्तीला नाही याचेच सखेद आश्चर्य वाटत असून , कोश्यारी हे राज्यपाल आहेत की भाजपाचे कार्यकर्ते आहेत असा सवाल सुद्धा कांबळे यांनी उपस्थित केला असल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र सरकार कोविड सारख्या महामारीशी यशस्वीपणे लढा देत असताना असा घातक सल्ला देऊन राज्यपाल महोदयांनी संविधानातील धर्मनिरपेक्षता या पायाभूत तत्त्वाची अवहेलना केली आहे. त्या संविधानाची शपथ घेऊनच आपण हे संविधानिक पदग्रहण केले आहे, यांचा त्यांना सोयिस्कर विसर पडलेला दिसतो. हा सल्ला जनतेच्या भल्यासाठी नसून त्यामागे खोडसाळ राजकीय उद्दिष्ट आहे, हे स्पष्ट आहे. असा सल्ला आणि त्यासाठी वापरलेली अशोभनीय भाषा राज्यपाल पदाचे अवमूल्यन करणारी आहे. राज्यपाल महोदय राज्याच्या राजकारणात नसता हस्तक्षेप करू लागले आहेत, याविषयी संशयाला जागाही राहिलेली नाही.म्हणूनच आम्ही भिम आर्मीच्या वतीने राज्यपाल हटाव अशी जाहीर मागणी भारताचे सन्माननीय राष्ट्रपती महोदयांना करीत असल्याचे भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकजी कांबळे यांनी सांगितले.
आपल्यावर सोपवण्यात आलेली संविधानिक जबाबदारी पार पाडण्यास मा. कोश्यारी असमर्थ असल्याचे त्यांनी स्वत:च दाखवून दिले आहे. त्यामुळे मान्यवर राष्ट्रपतींनी , राज्यपाल पदाला लायक नसणाऱ्या विद्यमान राज्यपाल महोदयांनी संविधानाचा आणखी जास्त उपमर्द करण्यापूर्वी त्यांना त्या जबाबदारीतून त्वरीत मुक्त करावे, अशी मागणी आम्ही भिम आर्मीच्या वतीने करीत आहोत.आपल्या बालिशपणामुळे आणि अशोभनीय राजकीय हस्तक्षेपामुळे आपल्या देशाच्या राष्ट्रपतींवर राज्यपालांनी दुर्धर प्रसंग आणला आहे, हे आपल्या थोर देशाचे दुर्दैव आहे. राज्यपाल महोदयांना बाडबिस्तरा आवरून त्या पदावरून निरोपाचा विडा देण्यास हे कारण पुरेसे आहे. त्वरित राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे.नाहीतर आम्ही भिम आर्मीच्या वतीने राजभवनासमोर सत्याग्रह करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम