बदलापुरात रस्त्यावर थांबल्याच्या रागातून एकाची हत्या. दोन तासात हल्लेखोर गजाआड .
- by Rameshwar Gawai
- Sep 10, 2020
- 1320 views
बदलापूर (प्रतिनिधी) : रस्त्यावर थांबल्याच्या क्षुल्लक कारणावरून बदलापुरात एका तरुणाने ३६ वर्षीय इसमाची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना बदलापुरात घडली आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासात शिताफीने तपास करून हत्या करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. मात्र क्षुल्लक कारणावरून झालेल्या हत्येच्या घटनेने बदलापुरात खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव ओमकार उर्फ बिल्ला पवार (२४) असे या तरुणाचे नाव असून तो बदलापूर पश्चिम भागात राहाणारा असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख यांनी दिली आहे.
बदलापूर पूर्वेकडील शिरगाव भागात राहणारा अनिकेत शिंदे व त्याचा मामा प्रवीण वैराळ (३६) मंगळवारी रात्री जेवणानंतर १०. ३० वा च्या सुमारास मोटरसायकलवर फिरायला निघाले होते. ते कर्जत- बदलापूर रस्त्यावरून जात असताना अनिकेतला फोन आला. त्यामुळे त्याने मोटरसायकल या रस्त्यावरील टीव्हीएस शोरूम समोरील रस्त्यावर थांबवली. त्यावेळी ओमकार याने प्रवीणच्या जवळ येऊन 'येथे कशाला थांबला' असे विचारून शिवीगाळ सुरु केली. त्यावर अनिकेतने शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली असता ओमकारने अचानक चाकू बाहेर काढून अनिकेतच्या पोटावर वार केला. त्यामुळे अनिकेत व प्रवीण मोटरसायकलवरून खाली पडले. त्याचवेळी ओमकारने प्रवीणच्या छातीत डाव्या बाजूस चाकू घुसवला आणि तो निघून गेला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अनिकेत व प्रवीणला रात्री पावणे बाराच्या सुमारास उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रवीणला मृत घोषित केले. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे सपोनि बुऱ्हाडे,सपोनि कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोराबाबत कोणतीही माहिती नसताना प्रत्यक्षदर्शी व गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या दोन तासात पोलिसांनी ओमकार उर्फ बिल्ला याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली,असल्याची माहिती दीपक देशमुख यांनी दिली.दरम्यान,याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम