स्वॅब न घेताच कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह मुरबाड मधील आरोग्य विभागाचा प्रताप

मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यात कोरोना सर्वदूर पसरत असतानाच कोविड चाचणीसाठी स्वॅब न घेताच एका १० वर्षीय चिमुकलीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट चक्क पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार  मुरबाडमध्ये घडला आहे.

याबाबत दैनिक आदर्श महाराष्ट्र ला मिळालेल्या माहितीनुसार मुरबाडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना स्वॅब टेस्टसाठी रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागत होते. यावर पर्याय म्हणून मुरबाड शहरातील जुना डाक बंगला येथील जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृहात अँटीजन रॅपिड कोरोना टेस्ट सुरू करण्यात आली. यामुळे रुग्णांना अवघ्या तासा भरात रिपोर्ट दिला जातो . मात्र याठिकाणी असणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी निव्वळ हलगर्जीपणा करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा गंभीर प्रकार आज समोर आला आहे.

मुरबाड शहरातील नागाचा खडक, प्रभाग क्रमांक १ च्या परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने याच परिसरातील सपकाळे कुटुंबीयांनी खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक २ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद रेस्ट हाऊस येथे अँटीजन रॅपिड कोरोना टेस्ट करण्यासाठी गेले. त्याठिकाणी असणाऱ्या संबंधित डॉक्टरांनी त्यांचे आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक घेऊन स्वॅबसाठी कॉल करून बोलविण्यात येईल असे सांगितले. त्यानुसार आज सकाळी संबंधित कार्यालयातून सपकाळे कुटुंबीयांना कॉल आला असता ,अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याच कुटुंबातील १० वर्षीय कोमल प्रदीप सपकाळे या चिमुकलीचे स्वॅब टेस्ट चक्क पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच सकाळीच या परिसरात फवारणी ही करण्यात आली. मुळात आमचे स्वॅब घेतलेच नाही अथवा कोणत्याही प्रकारची टेस्ट न करताच आमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कोमल आणि तिच्या कुटुंबियांनी सांगितले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा जीवघेणा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या घटनेने दहा वर्षीय कोमलला धक्का बसला असून या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सपकाळे कुटुंबीयांनी करत आहेत.

प्रतिक्रिया.

मुरबाडच्या आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. अपुरी कर्मचारी संख्या अहोरात्र मेहनत करून सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात स्वॅब घेण्याचे काम हायरिस्कचे असल्याने घाईगडबडीत चुकून सदरचा प्रकार घडला आहे. मात्र पॉझिटिव्ह अहवालातून कोमलचा नाव काढण्यात येईल. तसेच कोमलच्या ट्यूबमध्ये दुसऱ्याचे स्वॅब गेले असून त्याचा ही शोध सुरू आहे. पुन्हा असा प्रकार होणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेतली जाईल. मात्र मुरबाडच्या लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जास्तीतजास्त खबरदारी बाळगणे खूपच आवश्यक आहे.

डॉ. श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी, मुरबाड

संबंधित पोस्ट