पवईत मोबाईल चोरांचा सुळसुळाट!
- by Reporter
- Sep 07, 2020
- 936 views
मुंबई (जीवन तांबे) : जगभरात कोरोनाचे सावट असताना नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यात पवईत मोबाईल चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पवईतील चैतन्य नगर येथे काल एकाच दिवसात दोन मोबाईल चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. सायंकाळी ७ च्या सुमारास पवई फोटो स्टुडिओ यांच्या मालकाचा मोबाईल फोन त्यांच्या स्टुडिओ मधून चोरीला गेल्याचे कळताच दुकान मालकाने सिसिटिव्ही तपासत तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पवईतील चाळसदृश्य परिसरात असलेल्या एका चाळीत भाडे तत्वावर राहणारे डिंगळे यांच्या घरात मध्य रात्री सर्व साखर झोपेत असताना घरातील महागड्या कंपनीचे तीन मोबाईल आणि पर्स चोरीला गेले आहे.
चोरीला गेलेल्या पर्स मध्ये तीन हजार रोकड आणि नामांकित बँकेचे ए.टी.एम कार्ड देखील चोरीला गेले आहे. हा सर्व चोरीचा प्रकार कुटुंबातील व्यक्ती साखर झोपेतून जागे झाल्यावर कळाला.
या लॉकडाऊन परिस्थिती मध्ये हाताला रोजगार नसताना चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एकाच दिवसात झालेल्या दोन मोबाईल चोरीच्या घटनेने चैतन्य नगर चाळसदृश्य परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

रिपोर्टर