अव्वाच्या सव्वा वीज बिलांविरोधात काँग्रेस आक्रमक.
- by Rameshwar Gawai
- Sep 04, 2020
- 1683 views
अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ शहरात देखील गेल्या चार ते पाच महिन्याची वीज बिलातील तफावत सरसकट एकाच बिलामध्ये देण्यात आल्याने शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप करीत तातडीने वीज बिलात दुरुस्ती करून देण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील बारकुपाडा परिसरात राज पारधी समाजाची मोठी वस्ती आहे. विज वापर कमी असताना देखील मोठ्या प्रमाणात वीज बिल देण्यात आल्याचे सांगत या भागातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष सुधीर जाधव यांच्या नेतृत्वाखाली या नागरिकांनी विज बिल दुरुस्त करून देण्याची मागणी वीज वितरण विभागाकडे केली आहे. जोपर्यंत विज बिल दुरुस्त करून दिले जात नाही तोपर्यंत बिल न भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावर वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेत या भागात शिबिर घेऊन सदोष मीटर तपासण्याची मोहीम राबवली जाईल असे आश्वासन दिले आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या तहसीलदारांना देखील निवेदन देण्यात आल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम