नर्सिंग सेवा अधीक्षक" या पदाच्या अहर्तेमध्ये बदल करण्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांचे निर्देश
- by Reporter
- Aug 18, 2020
- 820 views
मुंबई (शेखर भोसले) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत येत असलेले "नर्सिंग सेवा अधीक्षक" हे पद मेट्रन या पदावरील अनुभवाच्या आधारे महापालिका कर्मचाऱ्यांमधूनच भरण्यात यावीत. तसेच हे पद भरण्याबाबत आडकाठी ठरत असलेली शैक्षणिक अहर्ता बदलण्यात यावी, असे निर्देश महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
"नर्सिंग सेवा अधीक्षक" या पदाची भरती व शैक्षणिक अहर्ता याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली भायखळा येथील महापौर निवासस्थानी, दि. १७ ऑगस्ट २०२० रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महापौर बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेवक सचिन पडवळ, मध्यवर्ती खरेदी खात्याचे उपायुक्त रमाकांत बिरादार, सार्वजनिक आरोग्य खात्याचे उपायुक्त देविदास क्षीरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणेकर संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, १९८४ मध्ये निर्माण करण्यात आलेल्या अहर्तेला तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी मेट्रन तसेच तत्सम कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. यामुळे अहर्ता बदलविणे आवश्यक असून त्या आशयाचा प्रस्ताव संबंधित विभागाने तातडीने सादर करावा. त्यानंतर महापालिका सभागृहाची मंजुरी प्राप्त करून तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणे सोयीचे होणार आहे, जेणेकरून महापालिकेच्या अनुभवी कर्मचाऱ्यांवर अन्याय न होता त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुखकर होण्यास मदत होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली सचिव संजय वाघ आणि इतर पदाधिकाऱयांनी या प्रश्नात विशेष लक्ष घालून कर्माचारयांना न्याय मिळवून दिला.

रिपोर्टर