ड्रेनेज लाईन तुंबल्याने बाल राजेश्वर रोडवर घाण पाण्याचे उंच झरे

मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पश्चिम येथील बाल राजेश्वर रोडवरील रस्त्याच्या मधोमध असलेले आज सकाळी ड्रेनेजच्या चेंबरमधून फेसाळलेल्या पाण्याचा झरा उंच उडायला लागल्याने रस्त्यावरील पादचारी व वाहनचालक काहीवेळासाठी सैरभैर झाले होते. परंतु तेथून वाहणारी भूमिगत ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे ड्रेनेजच्या पाण्याच्या प्रवाहाला अडचण निर्माण झाल्याने हे पाणी चेंबरमधून फाऊंटन प्रमाणे उंच उडत आहे याची कल्पना येताच स्थानिकांनी ताबडतोब पालिकेच्या टी वॉर्डमधील ड्रेनेज खात्यातील अधिकाऱयांना याची कल्पना देवून ड्रेनेज लाईन साफ करण्याची विनंती केली.

दरम्यानच्या काळात ड्रेनेजमधील पाण्याचा झरा उंच उडत असल्याने परिसरात सर्वत्र घाण पाणी पसरले होते. त्यामुळे वाहनचालकांना तेथून वाहने नेताना अडचण निर्माण होत होती. काही वेळांनी पालिकेच्या ड्रेनेज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी येऊन ही लाईन साफ करून घेतली व अडकलेला कचरा काढून लाईन स्वच्छ केल्याने तेथील पाण्याची उंच उडणारी फवारणी बंद झाली.

वेळोवेळी पालिकेकडून ही ड्रेनेज लाईन साफ होत नसल्यामुळे इथे चोकअप निर्माण झाला अशी प्रतिक्रिया येथील दुकानदार व स्थानिकांनी दिली. पालिकेचे ड्रेनेज खात्याच्या अधिकारी मात्र यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झाले नाही.


संबंधित पोस्ट