मुलुंडमधील नालेसफाईच्या कामाचा बोजवारा. अतिवृष्टीत सखल भागात पाणी साचण्याची शक्यता.

मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले): मुलुंडमधील नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा पालिकेच्या टी वार्डकडून केला जात असला तरी नाल्यातील गाळ तसाच पडून असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली तरी मुलुंडमधील काही मोठ्या नाल्यात जागोजागी कचरा व गाळ साचला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुसळधार पावसात नाले भरून नाल्यातील पाणी रस्त्यावर येवून मुलुंडमध्ये पाणी तुंबण्याची भीती निर्माण झाली आहे. 


मुलुंडमधील ४ मोठे नाले व इतर छोट्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी पालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी टेंडर काढून कंत्राटदाराला नालेसफाईचे काम दिले जाते. पावसाळ्यापूर्वी चार मोठ्या नाल्यांच्या साफसफाईचे कंत्राट स्थायी समितीच्या बैठकीत मंजुर होवून दिले जाते तर छोट्या नाल्यांची साफसफाई पालिकेच्या विभाग कार्यालयातील ड्रेनेज खात्याच्या कामगारांकडून केली जाते. यंदा कोरोनाचे संकट असल्याने आणि अनेक मजूर, स्थलांतरित कामगार मुंबई सोडून त्यांच्या गावी गेले असल्याने नालेसफाईसाठी माणसे कंत्राटदारांना मिळत नाही आहेत. त्याचा परिणाम नालेसफाईवर झाला असून बहुतेक नाले हे अर्धवट साफ केलेले आढळून येत आहेत. गाळ पुर्णपणे काढला न गेल्याने मोठा कचरा नाल्याच्या पाण्यातून वाहून न जाता जागोजागी अडकून पडलेला दिसत आहे. 

मुलुंडमध्ये बाउंड्रीलाईन नाला, बॉम्बे ऑक्सिजन नाला, केसरबाग नाला, नानेपाडा नाला असे चार मुख्य नाले आहेत तर ३६ खुले आणि ३४ बंद छोटे नाले आहेत. या चार मोठ्या नाल्यांना इतर सर्व छोटे नाले जोडण्यात आले असून, मोठ्या नाल्यांचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत खाडीला मिळते. परंतु समुद्रातील भरतीच्या वेळी पाणी उलट दिशेने आत येते त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि जर नाल्यात गाळ आणि कचरा असेल तर पाणी साचून रस्त्यावर येते. या नाल्यांत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो तसेच रस्त्यावरील माती आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून आलेल्या नाल्यांतून येणारा मातीचा गाळ यामुळे ह्या सर्व नाल्यात मोठ्या प्रमाणात मातीचा गाळ साचला जातो. हा गाळ पावसाळ्यापुर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या वेळी काढण्यात येतो परंतु जर गाळ काढण्यात नाही आला तर सखल भागात पाणी तुंबून परिसर जलमय होतो.  

प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यांत नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली जाते परंतु कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हे काम उशीराने सुरू करण्यात आले त्यातच नालेसफाईचे काम करणारे मजूर शहर सोडून गेल्याने मनुष्यबळाची कमतरता कंत्राटदाराला भेडसावू लागली परिणामी पाऊस जवळ आला तरी पूर्ण नाले साफ झालेच नाही आहे व नाल्यातील गाळ देखील पूर्णपणे काढण्यात आला नाही आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नाले भरून पावसाचे पाणी रस्त्यावर येवून मुलुंडचे रस्ते व परिसर जलमय होण्याची शक्यता वाढली आहे. झोपडपट्टी विभागात तसेच सखल भागात यामुळे पाणी साचून घरात पाणी जावू शकते, ही भीती निर्माण झाली आहे.

नुकतीच आमदार मिहीर कोटेचा आणि भाजपाचे पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंडमधील सर्व नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेवून नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याबद्दल पालिका अधिकाऱ्यांकडे असमाधान व्यक्त केले तसेच संपूर्ण नाले साफ करण्याच्या व नाल्यांतील पूर्ण गाळ काढण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या.  


संबंधित पोस्ट